रत्नागिरी जिल्ह्यातील मद्य विक्रीच्या 10 स्थलांतरित परवान्यांची मुंबईच्या अधिकार्यांकडून तपासणी
रत्नागिरी : जिल्ह्यातील सुमारे 10 वर्षापूर्वी देशी, विदेशी मद्य विक्रीचे परवाने स्थलांतरित झाले. ही परवाने स्थलांतराची कार्यवाही करताना राज्य उत्पादन शुल्कच्या (एक्साईज) संबंधित अधिकार्यांकडून चुकीच्या पद्धतीने कार्यवाही झाली आहे की नाही? याबाबतची तपासणी मुंबई विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी रत्नागिरीतील अधीक्षक कार्यालयात येऊन केली. यासंदर्भात कागदोपत्री झालेल्या कार्यवाहीचा तपशिलही पाहण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्कच्या एका अधीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली होती. त्याचवेळच्या कार्यकाळात रत्नागिरी जिल्ह्यातील 12 देशी, विदेशी मद्य परवाने नागपूर येथे स्थलांतरित करण्यास हिरवा कंदील देण्यात आला होता. या प्रक्रियेत चुकीची कार्यवाही किंवा आर्थिक उलाढाल झाली आहे की नाही? याचीही माहिती मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांकडून जमवली जात होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी रत्नागिरीतील राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक कार्यालयात सोमवारी आवश्यक तपासणी करत होते. त्यावेळी ज्यांचे परवाने स्थलांतरीत झाले आहेत त्यांनाही निमंत्रित करून माहिती घेतली जात होती. गुहागर, दापोली, रत्नागिरी, राजापूर, खेड तालुक्यातील 12 परवाने स्थलांतरित झाले आहेत. हे परवाने स्थलांतरित होण्याबाबत झालेल्या कार्यवाहीचे कागदपत्र राज्य उत्पादन शुल्कच्या संबंधित अधिकारी घेऊन आले होते.