
जि. प. सेवानिवृत्त कर्मचार्यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा
लांजा : गेल्या सात वर्षापासून तालुक्यातील 50 सेवानिवृत्त कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरक व गटविम्याची रक्कम प्राप्त झालेली नाही. अनेक प्रकारची बिलं देणे बाकी असून याबाबत सभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. भविष्यात अशीच स्थिती राहिली तर सेवानिवृत्त कर्मचार्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या निर्धार जि.प.सेवानिवृत्त कर्मचारी सेवासमिती लांजा तालुका सभेत करण्यात आला.
लांजा शहरातील शाळा नं. 5 येथे संघटनेची सभा तालुकाध्यक्ष मुबारक शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सरचिटणीस विश्वास तळसंदेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. संघटनेत आलेल्या नवीन सभासदांचे यामध्ये विजय साळसकर, विनोद सावंत, मधुरा सरदेसाई, सूर्यकांत लांजेकर, मनिषा तेंडुलकर, अशोक कुंभार यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर अध्यक्षांच्या हस्ते वयोवृध्द सभासद श्री.गांधी गुरुजी, वैशाली पाध्ये, संयोगिता पाध्ये यांचा सत्कार करण्यात आला. संघटनेच्या मार्फत करण्यात आलेल्या प्रलंबित प्रश्न आणि पाठपुरावा कामाचा आढावा अध्यक्ष मुबारक शेख यांनी सभागृहासमोर ठेवला. गेल्या सात वर्षापासून लांजा तालुक्यातील 50 सेवानिवृत्त कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेचा एकही हप्ता अजूनपर्यंत दिला गेलेला नाही. तसेच गटविम्याची रक्कम गेल्या सात वर्षापासून दिली नाही. अनेक प्रकारची बिलं सेवानिवृत्त कर्मचार्यांची देणे बाकी आहेत. याबाबत सभेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. जिल्हाध्यक्ष बबन बांडागळे यांचे सोबत उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांची घेतलेली भेट आणि सातव्या वेतन आयोगाचा एकही हप्ता न मिळालेल्या सभासदांचे अर्ज सादर केल्याचा वृत्तांत आणि लांजा गटविकास अधिकारी यांच्या भेटीचा वृत्तांत ठेवला. यावर सभागृहात चर्चा करण्यात आली. सदर चर्चेत प्रामुख्याने प्रभाकर कोळवणकर, सूर्यकांत लांजेकर, यशवंत पाडावे, विनोद सावंत, विलास चाळके, विजय साळसकर, नमिता बारस्कर आदींनी सहभाग घेतला. 17 डिसेंबरच्या पेन्शनर डे बाबत चर्चा करण्यात आली.