
कोकणातील ‘धरण’साठा यंदाही राज्यात अव्वल
रत्नागिरी : राज्यासह कोकणात सर्वच भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने दिलासा दिला आहे. राज्यात असलेल्या धरणातील 95 टक्के जलसाठ्यामध्ये कोकणातील धरणांचा साठा हा अव्वल ठरला आहेे. त्यामुळे कोकणातील बहुतांश प्रकल्पांतून विसर्ग झाला असला तरी सततच्या पावसाने पाणीसाठा कायम राहिला आहे. कोकण विभागातील जवळपास सर्वच धरणे काठोकाठ भरली असून यावर्षी या धरणांमध्ये आहेत.98.53 टक्के पाणीसाठा झाला आहे.
सध्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 25 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीच्या पुढे झाला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोकणात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. याच कालावधीत कोकणातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला होता.
ऑगस्टच्या शेवटी रत्नागिरी जिल्ह्यातील तीन मोठ्या धरणांमधील पाणीसाठा 90 टक्क्यांवर पोहोचला होता तर एका प्रकल्पातील म्हणजे अर्जुना प्रकल्पातील धरणसाठा 100 टक्के इतका होता. सप्टेंबरच्या दुसर्या आठवड्यापासून पुन्हा विविध भागांत पावसाने जोर धरल्याने या कालावधीत पाणीसाठ्यात आणखी भर पडली. त्यामुळे अनेक धरणातील पाण्याचा विसर्ग केल्याने नियंत्रणात होता. महत्त्वाच्या प्रकल्पांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग झाला असला, तरी पावसाच्या सातत्याने पाणीसाठा कायम राहिला आहे.




