विना परवानगी लकी ड्रॉ प्रकरणी मनसेचे वैभव खेडेकर यांच्या विरोधात गुन्हा
खेड : गणेशोत्सव काळात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे व राजवैभव प्रतिष्ठानतर्फे विना परवानगी लकी ड्रॉ आयोजित करून लाखो रुपयांची बक्षिसे वाटल्याप्रकरणी मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी अंती सोमवार दि.26 रोजी गुन्हा देखील दाखल केला आहे, अशी माहिती तक्रारदार अरबाज बडे यांनी दिली आहे. खेड येथील रहिवासी असलेले अरबाज असगरअली बडे (वय 25) रा. खेड हे मानवाधिकारी जर्नलिस्ट असोसिएशनचे युवा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत आहे. खेडेकर यांनी लकी ड्रॉ काढून नियमबाह्य पैसे जमा करून धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता खेड येथे लाखो रुपये किमतीच्या मोटार सायकलचे वितरण केले, अशी तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी केली होती. लकी ड्रॉ तिकीट हे 100 रुपये किमतीला विकले होते. दहीहंडी उत्सव, गणेश उत्सव व नवरात्री उत्सव या सणाकरिता देणगी निधी जमा करण्यापूर्वी धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता खेड वाणीपेठ तसेच बाजारपेठेतील व्यापारांना बेकायदेशीर पावत्या दिल्या.त्यावर कोणताही रजिस्ट्रेशन नंबर नव्हता, असे बडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यानंतर 26 रोजी खेडेकर यांच्या विरोधात फसवणूक व स्पर्धा कर आकारणी अधिनियम 1958, महाराष्ट्र लॉटरी नियंत्रण व कर आकारणी आणि बक्षीस स्पर्धा अधिनियम 1958 च्या कायद्यांचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे अधिक तपास करत आहेत.