रत्नागिरी जिल्ह्यात शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ; घरोघरी घटस्थापना
रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी सुमारे 394 सार्वजनिक तर 70 वैयक्तिक देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. तरुणाई आता दांडियासाठी सज्ज झाली आहे. सोमवारी देवीची शास्त्रपध्दतीने पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. घरोघरीदेखील घट बसविण्यात आले आहेत. त्यात ओले आणि सुके घट बसवण्याची प्रथा आहे. त्याशिवाय केवळ फोटोची प्रतिष्ठापना करुन नवरात्रोत्सव साजरा केला जातो. जिल्ह्यातील रत्नागिरी शहरातील भगवती देवी, आडिवरे येथील महाकाली, चिपळूणची विंध्यवासिनी, तुरंबवची शारदादेवी, खेडची काळकाई देवीच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. विशेषतः महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी येथे गर्दी असते. यंदा तरुणाईचा उत्साह अधिक दिसत आहे. काही मंडळातर्फे स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. या निमित्त बाजारात विविध प्रकारचे कपडे, दांडिया विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.