नवरात्र उत्सव व मानपानाच्या वादामुळे गुहागर खालचापाट भंडारवाडा येथे कलम 144 लागू
गुहागर : शहरातील खालचापाट भंडारवाडा येथील श्री वराती देवीचा नवरात्र उत्सव व मानपानावरून येथील दोन गटात वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी येथील मंदिर परिसरात 144 कलम (मनाई आदेश) लागू केले आहे. मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या आदेशानुसार, दि.26 सप्टेंबर सकाळी 5 वा. ते दि. 5 ऑक्टोबर रोजी रात्री 22 वा. पर्यंत श्री. वराती देवी मंदिर व खालचापाट गुहागर परिसर येथे बंदी आदेश लागू आहे. मंदिरामध्ये नवरात्रोत्सव कालावधीत पूजा व आरती करण्यापासून दोन्ही पक्षकारांना व त्यांच्या प्रतिनिधींना प्रतिबंधित करण्यात आलेआहे. या कालावधीमध्ये दोन्ही गटातील कोणीही खालील अटींचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सूचित करण्यात आले आहे.
श्री वराती देवी युवा मंडळ व गोयथळे मोरे मंडळी यांच्यामध्ये गेले वर्षभर मंदिर कमिटी रजिस्ट्रेशन करणे, उत्सव साजरे करणे व मानपान यावरून वाद सुरू आहेत. यावेळी नवरात्र उत्सव साजरा करण्यावरून दोन गटात मतभेद निर्माण झाले होते. यातून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गोयथळे व मोरे मंडळींतर्फे तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले होते. याबाबत तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांनी दोन्हीकडील प्रमुख व्यक्तींना बोलावून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. याला यश न आल्याने अखेर तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी रविवारी रात्री उशिरा येथील भागात 144 कलम लागू केले.