खेडमधील ‘त्या’ बैलाला लम्पी आजार; पुण्यात केली तपासणी
खेड : तालुक्यामध्ये मागील आठवड्यात लम्पी सदृश आजार असलेला बैल आढळून आला होता. त्याच्या आजाराचा नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठवण्यात आला होता. या बैलाला लम्पी आजार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पशुधन विभागातर्फे आजाराच्या प्रतिबंधासाठी लस मोहीम हाती घेतली असून जिल्ह्यात 20 हजार जनावरांना लस देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे 73 व स्टेटचे 80 असे एकूण 157 पशु दवाखाने असून, या ठिकाणी या रोगासंदर्भात औषधे देण्यात आली आहेत. जिल्ह्याला 85 हजार लसींचा पुरवठा झालेला आहे. वेळेत उपचार झाल्यास हा रोग बरा होतो. जिल्ह्यात लससाठाही मोठा आहे. पशुपालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे आवाहन जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाने केले आहे.