रत्नागिरीत घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत श्री दुर्गामाता दौड
रत्नागिरी : प्रतिवर्षाप्रमाणे सलग दहाव्या वर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे (रत्नागिरी) शहर व आसपासच्या पंधरा-वीस गावांतील धारकर्यांची श्री दुर्गामाता दौड घटस्थापना ते विजयादशमी या कालावधीत आयोजित केली आहे. दौड काढताना दररोज एका सार्वजनिक मंडळाच्या देवीचे दर्शन घेतले जाते.
2012 पासून ही दौड दरवर्षी काढण्यात येत असून, या दौडमध्ये हातखंबा, निवळी, खेडशी, कारवांचीवाडी, पाली, कसोप, फणसोप, मिर्या, नाचणे, कुवारबाव, शिरगाव, पावस, मावळंगे, कोळंबे येथील ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. दोन वर्षे कोरोना महामारीमुळे दौडमध्ये खंड पडला होता. मात्र यंदा दिमाखात व मोठ्या संख्येने पुन्हा दौड काढण्यात येणार आहे.
गेली अनेक वर्षे या उपक्रमाला शिवप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळत असून, या वर्षीची दौड नवरात्रौत्सवाच्या शुभारंभाच्या दिवशी 26 सप्टेंबरला सुरू होईल आणि 5 ऑक्टोबरला या दौडची सांगता होणार आहे. दौड काढल्यानंतर यामध्ये शहर व शहरालगतच्या गावांतील शिवप्रेमी, धारकरी, हिंदू, देशभक्त बंधू-भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष राकेश नलावडे व धारकर्यांनी केले आहे.