मळण येथील शेतकऱ्याने फुलवला झेंडूचा मळा
गुहागर : तालुक्यातील मळण येथील शेतकरी विलास साळवी व मनोहर साळवी या बंधूंनी शृंगारतळी वेळंबरोड येथील सतीचा माळ येथे एक एकर जमिनीमध्ये झेंडू फुलांचा मळा फुलवला आहे. कोकणच्या लाल मातीत यशस्वी लागवड केली आहे. परंतु वीज आणि कृषी विषयक सल्ला मिळत नसल्याने शेतीमध्ये वाढ करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. वर्षानुवर्ष शेतकर्यांकडून विजेची मागणी करूनही त्यांना वीज पुरवठा दिला जात नाही. यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात आहेत. स्वतः च्या जमिनीत मेहनत करून चांगली पिके तयार करून या पिकांना बाजारपेठेमध्ये योग्य दर मिळत नाही. अशा शेतकर्यांना शासनाच्या अधिकार्यांनी बाजारपेठ उपलब्ध करुन दिल्यास पीक घेणारे शेतकरी हे त्याहून अधिक पिक घेऊ शकतात. शासनाच्या शेतकर्यांसाठी असणार्या योजना व योग्य मार्गदर्शन व शेतीसाठी हव्या असणार्या सोयीसुविधा दिल्यास शेतकर्यांमध्ये प्रगती होऊन आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. गेल्या वर्षभरापासून मळण येथील विलास साळवी व मनोहर साळवी या शेतकर्यांनी महावितरणकडे शेतीसाठी तातडीने वीज जोडणी मिळावी यासाठी अर्ज केला होता. परंतु महावितरण कंपनीने अद्याप वीजजोडणी दिलेली नाही.