
ना. उदय सामंत यांचा रत्नागिरी जिल्हा बँकेतर्फे सत्कार
रत्नागिरी : रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार उदय सामंत यांची महाराष्ट्र राज्याच्या उद्योगमंत्रिपदी नियुक्ती झाल्याने त्यांचा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
बँक संचालक मंडळाच्या सभेचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे हा सत्कार करण्यात आला. यावेळी रत्नागिरी जिल्हा को-ऑप. बँक्स् एम्प्लॉईज युनियन यांच्यावतीने संघटनेचे जॉईंट जनरल सेक्रेटरी जितेंद्र साळवी यांनीदेखील पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
सत्कार समारंभामध्ये मनोगत व्यक्त करताना बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे म्हणाले, ना. सामंत यांनी जिल्ह्यामध्ये नवनवीन उद्योगधंदे आणून बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी. याकरिता जिल्हा बँकेमार्फत लागणारे जरूर ते सर्व योगदान देण्यात येईल. बँकेमध्ये कामकाज करीत असताना ना. उदय सामंत यांची बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याकरिता बँकेला सहकार्य लाभलेले आहे. त्यांची जिल्हा बँकेबद्दल असलेली आस्था व आपुलकी यामुळे त्यांचा सत्कार करण्याचे बँकेने ठरविले, असे उद्गार काढले.
ना. उदय सामंत म्हणाले, जिल्ह्यामध्ये नवनवीन उद्योगधंदे आणू. जिल्ह्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक ते प्रयत्न करणार आहे. शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार योजनेतून जिल्ह्यातील तरुणांना उद्योजक म्हणून उभे करणार असून, त्याकरिता जिल्हा बँकेने आवश्यक ते सहकार्य करावे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक ही राज्यातील पहिल्या दोन क्रमांकामधील बँक असून, या बँकेमध्ये होणार्या कोणत्याही समारंभाला मला अगत्याने निमंत्रित केले जाते. डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली बँकेने चांगली प्रगती केली आहे. यापुढेही त्यांच्याच नेतृत्वाखाली बँक कार्यरत राहील, अशी आशा व्यक्त
केली.
या सत्कार समारंभाला बँकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, गजानन पाटील, मधुकर टिळेकर, महादेव सप्रे, अमजद बोरकर, दिनकर मोहिते, महेश खामकर, रामचंद्र गराटे, जितेंद्र साळवी व नरेश कदम, तसेच बँकेचे सरव्यवस्थापक डॉ. सुधीर गिम्हवणेकर व अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.




