
नवरात्रोत्सवाला सोमवारपासून होणार प्रारंभ; रत्नागिरी जिल्ह्यात 450 ठिकाणी होणार दुर्गामाता विराजमान
रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवार 26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे. त्यामुळे नऊ दिवस जिल्ह्यात दांडिया आणि गरब्याची धूम सुरू राहणार आहे. जिल्ह्यात यावर्षी 450 ठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये रत्नागिरी शहर पोलिस ठाणे अंतर्गत 50 सार्वजनिक व खासगी 0, ग्रामीण पोलिस ठाणे : सार्वजनिक 86 तर खासगी 6, जयगड : सार्वजनिक 20 तर खासगी 3, संगमेश्वर : 12 सार्वजनिक तर खासगी 7, राजापूर : 9 सार्वजनिक तर खासगी 0, नाटे : 8 सार्वजनिक तर खासगी 5, लांजा सार्वजनिक 15 तर खासगी 2, देवरूख : सार्वजनिक 23 तर खासगी 3, सावर्डे सार्वजनिक 3 तर खासगी 1, चिपळूण सार्वजनिक 15 तर खासगी 0, गुहागर सार्वजनिक 20 तर खासगी 1, अलोरे सार्वजनिक 11 तर खासगी 0, खेड सार्वजनिक 22 तर खासगी 0, दापोली : सार्वजनिक 34 तर खासगी 18, मंडणगड सार्वजनिक 30 तर खासगी 0, बाणकोट सार्वजनिक 14 तर खासगी 4, दाभोळ सार्वजनिक 2 तर खासगी 6, पूर्णगड सार्वजनिक 20 तर खासगी 0 अशा प्रकारे एकूण 450 दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. कोकणामध्ये पूर्वी ग्रामदेवतांच्या मंदिरांपुरताच घटस्थापना करण्यापर्यंत उत्सव मर्यादित होता. मात्र, ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये घटस्थापना करण्याबरोबरच एखाद्या वाडीवस्तीवर देवीची मूर्ती आणून तिची स्थापना करून, दांडियाचे कार्यक्रम आयोजित करण्याची प्रथा मागील काही वर्षांपासून वाढीस लागली आहे. काही भागांमध्ये मात्र ग्रामदेवतांच्या मंदिरासमोरच हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शहरांमध्ये मात्र गल्लोगल्ली व काही भागांमध्ये उत्सव साजरे करण्याचे प्रमाण वाढले आहे. गरब्याचे आयोजन प्रामुख्याने गुजराथी वस्ती असणार्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात होत असल्याने जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह काही पंचक्रोशींच्या ठिकाणीही असे कार्यक्रम केले जाणार आहेत. रत्नागिरी शहरातदेखील मागील काही वर्षात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे.