
कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात शाळा प्रवेशोत्सव
रत्नागिरी : शाळेच्या पहिल्या दिवशी कृष्णाजी चिंतामण आगाशे विद्यामंदिरात पाठ्यपुस्तके व गुलाबपुष्प देऊन, ढोल ताशांच्या गजरात नवागतांचे अनोखे स्वागत करण्यात आले. रंगीबेरंगी फुग्यांची कमान उभारून आणि शेजारी कार्टून्सची चित्रे लावून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या आवारात ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या स्वागतामुळे बालदोस्त आनंदित झाले.भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह सुनील वणजू, शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, सदस्य चंद्रकांत घवाळी, अनंत आगाशे, श्रीकृष्ण दळी, मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम, ज्येष्ठ शिक्षिका सौ. गीता सावंत, सौ. भारती खेडेकर यांच्यासमवेत सर्व शिक्षक, पालकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांच्यावर पृष्पवृष्टीसुद्धा करण्यात आली.शाळेच्या नाटेकर सभागृहात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापिका कदम यांनी शाळेची माहिती दिली आणि बालदोस्तांचे स्वागत केले. त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीमधील प्रातिनिधीक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.