
रत्नागिरीत मरीन व मँगो पार्कसाठी प्रयत्न; जिल्ह्यातील 12 ते 15 हजारजणांना रोजगार : ना. उदय सामंत
रत्नागिरी : रत्नागिरीत मरीन व मँगो पार्क उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असून त्यातील मरीन पार्क उभारण्यासाठी आठ दिवसात आराखडा तयार करण्यात आला आहे. 350 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. यामध्ये जिल्ह्यातील 12 ते 15 हजारजणांना रोजगार मिळणार असून तेवढाच रोजगार मँगो पार्कच्या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
रत्नागिरी येथे निर्यात आणि एक जिल्हा एक उत्पादन या दोन दिवसाच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले असून त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. रत्नागिरी शहरातील अरिहंत मॉलमधील टिळक सभागृहात आयोजित परिषदेला जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उद्योग सहसंचालक एस. आर. लोंढे, सहसंचालक कोकण विभाग सतीश भामरे, सिडबीचे उपमहाव्यवस्थापक रहाटे, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी ना. सामंत म्हणाले की, रत्नागिरीतील उद्योजक स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे, त्याला राजाश्रय मिळावा, हा उद्देश आहे. या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यात नवीन उद्योजक, निर्यातदार तयार होतील. स्टरलाईट उद्योग समूहासाठी 500 एकर जागा एमआयडीसीने 1992 मध्ये दिली. त्यावर उद्योग उभारण्यात आलेला नाही.
याबाबत शासनाने न्यायालयीन लढाई जिंकली असली तरी अद्यापही जागा ताब्यात घेण्याचे प्रयत्न झाले नाही. येणार्या 12 ऑक्टोबर रोजी ही प्रक्रिया सुरु होत आहे. ही जागा ताब्यात घेऊन या ठिकाणी इतर उद्योगांच्या माध्यमातून स्थानिकातील हजारोंना रोजगार मिळेल याबाबत पावलं उचलली जात आहेत. जेएसडब्ल्यू कंपनीबरोबर नुकतीच बैठक झाली. 5 हजार कोटीची गुंतवणूक असलेला वीज निर्मिती प्रकल्प ते करणार आहेत. त्यामधून 550 लोकांना कायमस्वरुपी तर 1200 लोकांना कंत्राटी तत्वावर रोजगार मिळणार आहे. कोरोना काळात देशातील 4 ठिकाणी औषध निर्मिती प्रकल्प (ड्रग पार्क) उभारण्याचा निर्णय झाला होता. पण या आधीच्या सरकारच्या उदासीन धोरणाचा फटका बसला व मागील दोन वर्षात रोहा, मुरुड येथील एक इंच जमीनही त्यासाठी दिली गेली नाही. केंद्र शासनावर अवलंबून न राहता महाराष्ट्र शासन औषध पार्क उभे करणार आहे. त्यासाठी 50 हजार कोटीची गुंतवणूक करण्यात येईल.