
भाजपाचे नेते शिरूभाऊ फणसे यांचे निधन
- संगमेश्वर तालुका भाजपाचे संस्थापक सदस्य व माखजन गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य शिरूभाऊ फणसे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.
ज्या ज्या व्यक्तींनी स्वतः च्या स्वार्थाची कसलीही पर्वा न करता संगमेश्वर तालुक्यात भाजप जिवंत ठेवला अशा अनेक महनीय व्यक्तिमतांपैकी एक शिरूभाऊ फणसे होते. त्याचे दुःखद निधनाने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली असून तालुका पोरका झाला आहे, अशी प्रतिक्रीया माजी आमदार व दक्षिण भाजपाचे जिल्हाध्यक्ष डाँ. विनय नातू व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
कासे जवळील कळंबूशी गावचे शिरूभाऊ संघाचे क्रियाशील स्वयंसेवक होते. लोकनेते कै. तात्या नातू यांचे बरोबरीने जनसंघ व नंतर भाजपा तळागाळात नेण्यात त्यांचे महत्वाचे योगदान होते. १९९२ ला ते माखजन गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. माखजन परिसराच्या विकासात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले.
शिरूभाऊंनी माखजन शिक्षण मंडळसह नायरी, कळंबूशी, वडेर आदी मंडळांची अध्यक्षपदे भुषवली होती. त्यांना संगमेश्वर भाजपातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच जिल्हाध्यक्ष दिपक पटर्वधन, माजी आम. बाळ माने, डाँ. विनय नातू, जिल्हा सचिव सचिन वहाळकर, तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, मुकुंद जोशी, संघाचे दिलिप जोशी, चंदू जोशी आदींनी रत्नागिरी येथे जावून त्यांचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. तर शिरूभाऊंच्या निधनानंतर माखजन परिसरातील सर्व संस्थांच्या शाळा व बाजारपेठा बंद करण्यात आल्या होत्या.