बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा; कोकणात घटस्थापनेपर्यंत कोसळणार हलक्या सरी

रत्नागिरी : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबामुळे परतीच्या प्रवासात कोकण किनारपट्टीवर हलका पाऊस शक्य आहे.  शुक्रवारपासून पुढील आठवड्यात सोमवारपर्यंत म्हणजे घटस्थापनेपर्यंत  सर्व जिल्ह्यात ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात गुरूवारी रात्री आणि शुक्रवारी संध्याकाळी पावसाच्या सरींनी हजेरी लावली.  मोसमी पावसाने 20 सप्टेंबरला देशातून माघारीचा प्रवास सुरू केला आहे. उत्तर-पश्चिम राजस्थानसह कच्छ भागातून पावसाने परतीचा प्रवास सुरू केला आहे. पुढील दहा ते पंधरा दिवसांत महाराष्ट्रातून त्याचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. पावसाचा परतीचा प्रवास सुरू असतानाच बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या भागातून थेट मध्यप्रदेशपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून विविध भागांसह महाराष्ट्रात काही भागांत पुढील दोन दिवस पावसाची शक्यता हवामान विभगाने वर्तविली आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ आदी जिल्ह्यांत काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यांत, तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नगर, जळगाव, नंदुरबार, धुळे आदी जिल्ह्यांत एक ते दोन दिवस पावसाची शक्यता असून मुंबईसह कोकणातील रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही दिवसात  पावसाचा जोर कमी झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button