
निर्यात विकासासाठी उद्योग संचालनालयाकडून रत्नागिरीत प्रोत्साहन परिषद
रत्नागिरी : जिल्ह्याच्या निर्यात विकासासाठी उद्योग संचालनालय आणि सिडबी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसांच्या कालावधीत निर्यात आणि एक जिल्हा एक उत्पादन, व्यवसाय करण्यास सुलभता, गुंतवणूक प्रोत्साहन परिषद आयोजित करण्यात आली आहे. याचा शुभारंभ उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
ही परिषद रत्नागिरी शहर बसस्थानकासमोरील अरिहंत मॉल इमारतीमधील लोकमान्य टिळक सभागृहात होणार आहे. यावेळी अपेडा, एम-पेडा, विदेश व्यापार महासंचालनालय, फेडरेशन ऑफ इंडियान एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन, मैत्री कक्ष आदी विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी विविध उद्योग व विभागांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील निर्यातदार उद्योजक आणि आंबा बागायतदार, निर्यात करु इच्छिणारे उद्योजक आणि बागायतदार, अन्य उद्योजकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी केले आहे.
शासनाच्या एक जिल्हा एक उत्पादन योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्यात आंबा आणि मासळी या दोन उत्पादकांची निवड झाली आहे. या दोन्हीच्या निर्यातीसाठी ही परिषद अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. निर्यात प्रोत्साहनासाठी शासनाने कोणत्या सुविधा उद्योजकांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. यावर कोकण विभागाचे सहसंचालक सतीश भामरे मार्गदर्शन करणार आहेत. आंबा निर्यातदार अमर देसाई हे आपले अनुभव मांडणार असून निर्यातीसाठी उद्योजकांना करावी लागणारी कागदोपत्री माहिती, नियम यावर फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनचे निकेतन भोसले माहिती देणार आहेत. दुपारच्या सत्रात निर्यातीमधील संधी आणि जिल्हास्तरावरील परवानग्या यावर अपेडाच्या प्रणिता चौरे, अतुल साठे मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्ह्यातील बागायतदार व मत्स्य व्यवसायिकांनी या परिषदेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती कुलकर्णी यांनी केले आहे. राज्याचे प्रधान उद्योग सचिव, विकास आयुक्त आणि निर्यात आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील हेही यावेळी विशेष मार्गदर्शन करणार आहेत.