तळेकांटे येथे कंटेनर उलटला
संगमेश्वर : मुंबई- गोवा महामार्गावरील तळेकांटे येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कंटेनरचा अपघात झाला. झोप अनावर झाल्याने कंटेनर विरुद्ध दिशेला जाऊन दरीत कोसळला. सुदैवाने कंटेनर झाडावर आदळल्याने बावनदीत जाता जाता बचावला. प्रसंगावधान राखत चालकाने कंटेनर मधून उडी मारल्याने थोडक्यात बचावला. मुंबई – गोवा महामार्गावरून कंटेनर संगमेश्वर येथून रत्नागिरीच्या दिशेने येत होता. कंटेनर तळेकांटे येथील गणेश मंदिराजवळ आला असता चालकाला झोप अनावर झाल्याने डुलकी लागली. यावेळी कंटेनर खालच्या बाजूला जाऊन दरीत कोसळला. खालच्या डाव्या बाजूला एका मोठ्या झाडाला अडकला. चालकाने तत्काळ कंटेनर मधून उडी मारली. सुदैवाने समोर वाहन न आल्यामुळे तो खालच्या बाजूला वळला अन्यथा एखाद्या वाहनावर जोरदार आदळून मोठा अपघात झाला असता. अपघातानंतर सकाळच्या सुमारास वाहतूक काही काळ ठप्प होती.