हुतात्मा केशव महादेव जोशी यांच्या तैलचित्राचे रविवारी अनावरण

चिपळूण :: कोकणातील लांजा तालुक्यातील खानू गावचे क्रांतीवीर केशव महादेव जोशी हे २५ सप्टेंबर १९३० रोजी चिरनेर जंगल सत्याग्रहात हुतात्मा झाले होते. यंदा भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू आहे. त्यानिमित्ताने लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या कलादालनात क्रांतीवीर केशव महादेव जोशी यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. या तैलचित्राचा अनावरण समारंभ येत्या रविवारी (दि. २५) रोजी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे इतिहासाचे प्राध्यापक आणि अभ्यासक पंकज घाटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

१९३० साली देशभर गाजलेल्या जंगल सत्याग्रहात खानू गावचे रहिवासी केशवराव जोशी यांना वीरमरण आले होते. चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या वेळी ते मामलेदार होते. स्वकीय आंदोलकांवर गोळीबार करण्यास नकार दिला, म्हणून जोशींवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. केशवराव जोशी हे शिक्षण पूर्ण होताच कलेक्टर कचेरीत नोकरीला लागले होते. पहिल्या महायुद्धात कार्यालयीन कामात तत्परता दाखवल्यामुळे त्यांना बढती मिळून ते राजापूर येथे मामलेदार झाले होते. १९३० साली त्यांची बदली पनवेलला झाली होती. त्यावेळी स्वातंत्र्य आंदोलनाला धार आली होती. पनवेल तालुक्यात कल्हे आणि चिरनेर येथे ८ सप्टेंबर १९३० ला जंगल सत्याग्रह झाला. पोलिसांनी मामलेदार केशवराव जोशी यांच्याकडे गोळीबार करण्याची परवानगी मागितली. केशवरावांनी ठामपणे नकार दिला. २५ सप्टेंबरला चिरनेरलाच दुसरा सत्याग्रह ठरला. दोन-तीन हजार सत्याग्रहींनी प्रतिकात्मक सत्याग्रहाची सुरवात केली. पोलिस इन्स्पेक्टर पाटील फौजफाटा घेऊन धावले. सत्याग्रहींवर अमानुष लाठीहल्ला केला. मामलेदार जोशी सत्याग्रहाच्या स्थानी आले. त्यांनी लाठीमार बंद करून बेड्या काढायचा आदेश दिला. सत्याग्रही मामलेदाराच्या आदेशानुसार तोडलेल्या झाडासह आणि कोयते घेऊन अटक करून घ्यायला अक्का देवीच्या देवळाजवळ येऊ लागले. मामलेदार जोशी पाणी पिण्यासाठी जवळच्या विहिरीकडे गेले अन ती वेळ साधून पोलिस इन्स्पेक्टरने अचानक सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. गोळ्यांनी अनेकांचे प्राण घेतले. अनेकजण जखमी झाले. मामलेदार जोशी पोलिसांना आवरण्यासाठी पुढे धावले. मात्र इन्स्पेक्टर पाटील याने झाडाआडून मामलेदारांवरच गोळी चालवली. गोळी पाठीत घुसून छातीतून बाहेर आली. त्यांच्याजवळ उभा असलेला शेवडे नावाचा राऊंडगार्ड यालाही ठार मारण्यात आले. स्वातंत्र्य आंदोलनाला सहकार्य करणाऱ्या केशवराव जोशी यांची हत्या करण्यात आली होती. चिरनेरला असलेल्या हुतात्मा स्मृतिस्तंभावर त्यांचे नाव आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त कोकणातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांची तैलचित्रे वाचनालय लावणार आहे. यापूर्वी दिनकरशास्त्री कानडे यांचे तैलचित्र वाचनालयात लावण्यात आले आहे. केशव महादेव जोशी यांचे खानू हे गाव ना. उदय सामंत यांच्या मतदारसंघात येते. वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता तैलचित्र अनावरण कार्यक्रम होईल. हुतात्मा केशव महादेव जोशी यांना मानवंदना देण्यासाठी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button