मुंबईतील सराफ व्यापार्याचा रत्नागिरीतील व्यावसायिकाकडून खून; मृतदेह नेऊन टाकला गुहागर-आबलोलीत
रत्नागिरी ः मुंबईतील सोने – चांदीच्या व्यापार्याचा रत्नागिरीत दोरीने गळा आवळून खून करण्यात आला. रत्नागिरीतील सराफ व्यापार्याकडून अन्य दोघांच्या साथीने कर्जबाजारीपणामुळे हा खून करून त्याचा मृतदेह गुहागर तालुक्यातील आबलोली येथे नेऊन टाकण्यात आला. किर्तीकुमार अजय राज कोठारी (वय 55, रा. भाईंदर मुंबई) असा खून झालेल्या व्यापार्याचे नाव आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे रत्नागिरीतील एका सोने-चांदी व्यापार्यासह अन्य दोन संशयितांच्या मुसक्या आवळून गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांचीही रवानगी सात दिवसांसाठी पोलिस कोठडीत केली आहे. भूषण सुभाष खेडेकर (वय 42, रा. खालची आळी, रत्नागिरी), महेश मंगलप्रसाद चौगुले (वय 39, रा. मांडवी सदानंदवाडी, रत्नागिरी) आणि फरीद महामूद होडेकर (वय 36, रा. भाट्ये, रत्नागिरी) अशी तीन संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किर्तीकुमार कोठारी हा मुंबई येथून व्यावसायिक कामासाठी रविवार 18 सप्टेंबर रोजी रत्नागिरीतील आठवडा बाजार येथील श्रध्दा लॉजमध्ये राहायला होता. सोमवारी रात्री तो गोखले नाका ते रामआळी असे जात असताना त्यांना कोणाचातरी फोन आला. त्यावेळी तो परत मागे फिरून गोखले नाका येथून आगाशे कन्याशाळेजवळ चालत गेल्याचे सिसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून आले. त्यानंतर येथून ते बेपत्ता झाले होते. त्यानंतर मुलगा करण किर्तीकुमार कोठारी याने वडिलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. म्हणून करणने नातेवाईकांसह रत्नागिरीत येऊन वडील ज्या लॉजमध्ये उतरले होते, तेथे आणि वडिलांच्या संपर्कातील ज्वेलर्सकडून माहिती व चौकशी करून शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले. सोमवारी रात्री 8.24 वा. सुमारास किर्तीकुमार हे आगाशे कन्या शाळेसमोरील त्रिमूर्ती ज्वेलर्समध्ये जाताना सीसीटीव्हीत दिसून आले. परंतु ते दुकानातून पुन्हा बाहेर येताना दिसले नाहीत.
पोलिसांनी तसा तपास करत दुकान मालक भूषण खेडेकरसह या गुन्ह्यात त्याला मदत करणार्या अन्य दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच भूषणने मी महेश आणि फरीद या दोघांच्या मदतीने किर्तीकुमार कोठारी यांना आधी हातांनी मारले. नंतर दोरीने गळा दाबून ठार मारल्याचे सांगितले. त्यानंतर किर्तीकुमार यांचा मृतदेह दुकानातच गोणीत भरून दुकानाबाहेर उभ्या केलेल्या रिक्षातून आबलोली येथील जंगलमय नेऊन टाकल्याचे कबुल केले. याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.