
देवरूख बसस्थानकातून लांबवलेल्या चेनबाबत महिलेने दिली कबुली
देवरूख : बसस्थानकात तरुणीची चेन चोरण्याचा प्रयत्न करणार्या महिलेला देवरूख पोलिसांनी अटक केली आहे. तिला गुरूवारी सायंकाळी देवरूख न्यायालयात हजर करण्यात आले असता तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या महिलेने देवरूखमध्ये केलेल्या आणखी एका चेन चोरीच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
अनघा अनंत जोशी असे या महिलेचे नाव असून या महिलेला लांजातील एका गुन्ह्यात अटक झाली होती. हा गुन्हा सिध्द होऊन तिला एक वर्षाची शिक्षादेखील झाली होती, अशी माहिती देवरूख पोलीसांनी दिली आहे.
या महिलेने याआधी संगमेश्वर तालुक्यातील काटवली येथील तृप्ती अशोक उबारे या मुलीची सोन्याची चेन चोरल्याची कबुलीही पोलिसांना दिली. हा चोरीचा प्रकार 29 जुलै रोजी घडला होता. मात्र या गुन्ह्यातील चोरीच्या मुद्देमालाचे तिने काय केले? याबाबत माहिती मिळू शकली नाही. सोनवडे येथील निकिता सनगरे ही तरूणी बुधवारी घरी जाण्यासाठी देवरूख बसस्थानकात बसमध्ये चढत असताना अनघा जोशी या महिलेने तिच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. हा तिचा प्रयत्न त्या तरुणीने हाणून पाडत तिला पकडून ठेवले होते. यानंतर या महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले.