आंजणारी पुलावरून गॅसने भरलेला टँकर नदीत कोसळला; चालकाचा बुडून मृत्यू, गॅसगळती थांबवण्यात आले पथकाला यश
लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावरून भारत पेट्रोलियमचा गॅसने भरलेला टँकर नदीत कोसळला. त्यातील चालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गॅसने भरलेला टँकर नदीपात्रात कोसळल्याने गॅस गळती सुरू आहे. त्यामुळे महामार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात गॅस भरलेला टँकर महामार्गावरील आंजणारी नदीच्या पात्रात कोसळला. चालक प्रमोद जाधव (रा. उस्मानाबाद) हा आपल्या ताब्यातील टँकर क्रमांक एमएच 12- एल टी- 6488 घेऊन जयगडहून गोव्याच्या दिशेने चालला होता. महामार्गावरील आंजणारी घाटीच्या तीव्र उतारावर त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे हा टँकर थेट नदीपात्रात कोसळला. टँकर कोसळल्यानंतर टँकरचे नदीपात्रातच दोन तुकडे झाले. गॅसची टाकी चालक केबीनपासून वेगळी झाली. चालक प्रमोद जाधव याचा या अपघातात मृत्यू झाला. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. याठिकाणी वाहतूक पोलिस, लांजा पोलिस, रुग्णवाहिका तसेच हायवे क्रेनच्या सहाय्याने चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
हा अपघात दुपारी अडीचच्या सुमारास झाला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या रुग्णवाहिकेने मृत चालकाला लांजा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेले. गॅस गळतीमुळे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. हातखंबा येथील वाहतूक शाखेचे पोलिस, लांजा पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच फिनोलेक्स, जिंदाल कंपन्यांची सुरक्षा पथके, रत्नागिरी अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. भारत गॅसचे पथक गोव्याहून आल्यानंतर गॅसची गळती थांबवण्यास पथकाला यश आले.