
दापोली विधानसभा मतदार संघासाठी पन्नास ऑक्सिजन काँसंट्रेटर – आ.योगेश कदम यांची माहिती
खेड : दापोली विधानसभा मतदार संघासाठी पन्नास ऑक्सिजन काँसंट्रेटर यंत्र दाखल झाली असून आगामी कालावधीत आठ रुग्णवाहिका देखील मिळणार आहेत, अशी माहिती दापोली विधानसभा मतदार संघाचे आ.योगेश कदम यांनी दिली. येथील सभापती निवास येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी आ. कदम म्हणाले, जिल्हयात कोव्हिडं प्रादुर्भाव वाढत असताना ऑक्सिजन अभावी अनेक रुग्ण दगावत होते. मोठ्या शहरात रुग्णालयामध्ये हवेतून ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या ऑक्सिजन काँसंट्रेटर यंत्र या परिस्थितीत ग्रामीण भागात लोकांचे जीव वाचवायला उपयोगी पडू शकतात हे हेरून माझ्या आमदार निधीतून दापोली विधानसभा मतदार संघासाठी पन्नास ऑक्सिजन काँसंट्रेटर यंत्र खरेदी करण्याचा निर्णय मी घेतला.
ती यंत्र दापोली मतदार संघात दाखल झाली आहेत. या प्रत्येक यंत्राची क्षमता दहा लिटरची असून त्यामुळे एका यंत्रातून दोन जणांना ऑक्सिजन पुरवठा करता येणार आहे. ज्या कोरोना बाधिताना रुग्णालयातून घरी पाठवल्या नंतर देखील ऑक्सिजन ची गरज भासते अशा रुग्णांना मोफत घरी वापरासाठी ऑक्सिजन काँसंट्रेटर यंत्र सेवा देण्यात येणार आहे. एवढया मोठ्या संखेने ऑक्सिजन काँसंट्रेटर यंत्र उपलब्ध होणारा दापोली मतदार संघ हा जिल्ह्यातील एकमेव मतदार संघ असावा असे त्यांनी म्हटले आहे.
दापोली मतदार संघात कोरोना साथ रोखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले असून त्यामध्ये काम करणारे रुग्णवाहिका चालक, वॊर्डबॉय, नर्स, वैद्यकीय अधिकारी इत्यादी सर्वच कर्मचाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. या मतदार संघात उभारलेल्या शिवतेज कोव्हिडं केअर सेन्टरमधून २५० पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. आगामी कालावधीत सांभाव्य कोरोना लाटेसाठी आम्ही सज्ज आहोत. ही लाट थोपवण्यासाठी रुग्णालयामध्ये वीस टक्के खाटा लहान मुलांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. तर बालरोगतज्ज्ञ जे खासगी सेवा देत आहेत त्यांना सरकारी रुग्णालयासोबत जोडून घेण्याची विनंती देखील मी आरोग्य यंत्रणेला केली आहे. आरोग्य मंत्र्यांना केलेल्या विनंती मुळे खेड, दापोली व मंडणगड या प्रत्येक तालुक्यासाठी एक रुग्णवाहिका तर राज्य सरकारकडून खरेदी केल्या जाणाऱ्या ५०० रुग्णवाहिकापैकी दोन खेडसाठी, दोन दापोली साठी तर एक मंडणगड तालुक्यासाठी अशा एकूण आठ रुग्णवाहिका उपलब्ध होणार असल्याची माहिती आ.कदम यांनी यावेळी दिली.
www.konkantoday.com