रत्नागिरीत नगर परिषदेच्या सफाई कामगारांना मोकाट गुरे हाकलण्याचे काम
रत्नागिरी : शहरातील रस्त्यांवरच्या मोकाट गुरांना सफाई कामगार शहर हद्दीबाहेर हाकलून देत आहेत. रस्त्यांवरील ही गुरे पिटाळून लावण्यासाठी 10 सफाई कामगार सोमवारपासून कार्यरत झाले आहेत. रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरांचा उपद्रव फारच वाढला. पादचार्यांसह वाहनधारकांनाही या गुरांचा भयंकर त्रास होऊ लागल्याने रत्नागिरी नगर परिषदेकडे तक्रारी येऊ लागल्या. त्यानुसार मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी गंभीर दखल घेत गुरांच्या मालकांची ओळख पटवून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला केल्या. त्याचबरोबर गुरे पकडून त्यांचा लिलाव करण्यासंदर्भातही पर्याय मुख्याधिकार्यांकडून सुचवण्यात आला. नगर परिषदेच्या प्रत्येक विभागात अधिकारी, कर्मचारी वर्ग अपुरा आहे. त्यामुळे वेगळ्या विभागांची कामे करताना बहुसंख्य अधिकारी, कर्मचार्यांची दमछाक होत आहे. त्यात गुरे पकडण्यासाठी येणारा खर्च आणि त्यातून वसूल होणारी रक्कम याचा ताळमेळ बसत नसल्याने अखेर रस्त्यांवरची गुरे हाकलून देण्याचा पर्याय स्विकारण्यात आला. सफाई कामगारांना गुरे शहराबाहेर हाकलून लावण्यासाठी रोजच्या रोज पायपीट करावी लागत आहे.