
मुरुगवाडा पोलिस चौकीच्या मागे आढळला मृतदेह
रत्नागिरी : शहरातील मुरुगवाडा येथील पोलिस चौकीच्या मागे मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास प्रौढाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यमनुर संगाप्पा चळवादी (वय 50, मूळ रा. विजापूर-कर्नाटक, सध्या रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे प्रौढाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी यमनुर याच्या सख्ख्या भावाला यमनुर मिरकरवाडा येथील पोलिस चौकीच्या मागे मयत स्थितीत आढळून आल्याचे समजले. त्यानुसार त्याने त्याठिकाणी जाउन खात्री केली असता त्याला यमनुर एका बंद पडलेल्या बोटीजवळ निपचित पडलेला आढळून आला. याबाबत यमनुर याच्या भावाने शहर पोलिस ठाण्यात माहिती देताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस फौजदार चवेकर करत आहेत.