
पोलिस असल्याचे सांगत दागिने लांबवले; माळनाक्यात घडला प्रकार
रत्नागिरी : पोलिस असल्याचे सांगत महिलेचे सुमारे 60 हजार रुपयांचे दागिने लांबवले. ही घटना दि. 20 सप्टेंबर रोजी दुपारी 1.45 वा. सुमारास माळनाका येथील शिर्के हायस्कूलसमोर घडली. या प्रकरणी दोन अज्ञातांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुलभा मारुती पवार (वय 65, रा. फणसवळे बौद्धवाडी, रत्नागिरी ) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली. मंगळवारी दुपारी सुलभा पवार नातवंडांना शाळेत सोडण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्या मुलीची वाट बघत शाळेसमोरील झाडाखाली बसल्या होत्या. त्यावेळी दोघेजण तिच्याकडे आले. त्यातील एकजण त्यांच्याजवळ आला तर एक रस्त्याच्या पलीकडेच थांबला होता. जवळ आलेल्या माणसाने मी पोलिस असून पलीकडे असलेले आमचे मोठे साहेब असून त्यांनी तुम्हाला बोलावले असल्याचे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन सुलभा पवार तिथे गेल्या. तेव्हा रस्त्याच्या पलिकडे असलेल्या संशयिताने सकाळी इथे मर्डर झालेला असून गेल्या 2 ते 4 दिवसात चोरीचे प्रमाणही वाढलेले आहे. त्यामुळे तुम्ही अंगावरील दागिने काढून पर्समध्ये ठेवा. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन पवार यांनी अंगावरील सोन्याच्या बांगड्या आणि माळ काढून त्याने दिलेल्या कागदात गुंडाळून पर्समध्ये ठेवले. त्यानंतर संशयिताने पवार यांच्या पर्समध्ये हात घालून दागिने व्यवस्थित ठेवले ना, असे म्हणून निघून गेला. सायंकाळी 4 वा. सुमारास सुलभा पवार यांनी पर्समधील दागिने घालण्यासाठी बाहेर काढले असता कागदात त्यांच्या सोन्याच्या दागिन्यान ऐवजी प्लास्टिकच्या दोन बांगड्या आणि दगड होता. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.