
चिपळूण तालुका : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्याला 20 वर्षाची सक्तमजुरी
चिपळूण : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या तरूणास येथील विशेष न्यायाधीशांनी 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. अभिजित गौतम जाधव (वय 30) असे शिक्षा झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी 10 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील म्हणून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पराज शेट्ये यांनी काम पाहिले. तर विशेष न्यायाधीश एन. एस. मोमीन यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली आहे. 11 मे 2018 रोजी दुपारी एक वाजता पीडित 11 वर्षाची मुलगी घरी एकटीच होती. आई मुंबईला गेली होती, तर वडील कामानित्ताने बाहेर गेले होते. ही संधी साधून अभिजित गौतम जाधव हा पीडितेच्या घरी गेला. तिच्यावर जबरदस्तीने अतिप्रसंग केला. तिच्या आईने सावर्डे पोलिस ठाण्यात घटनेची फिर्याद दिली. याप्रकरणी आरोपीविरूद्ध पोक्सो कायद्या अंतर्गत दोषारोप पत्र पाठविण्यात आले होते. पुराव्याअंती अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एस. मोमिम यांनी आरोपीस दोषी ठरवले. आरोपीला 20 वर्षे सक्तमजुरी आणि 25 हजार दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास 6 महिने साधी शिक्षा सुनावली.