
शिवसेनेतील वरिष्ठांची हुजरेगिरी करून सचिन कदम यांनीही ठेके मिळवले… त्यांनी टीका करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा : अभय सहस्त्रबुद्धे यांचे प्रत्युत्तर
चिपळूण : चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या ठेकेदारीवर आज जे बोलताहेत ते शिवसेनेच्या नावावर दादागिरी करून पैसे मिळवणारे ठेकेदार आहेत. त्यांचे बोलणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे प्रत्युत्तर माजी पं. स. सदस्य व सदानंद चव्हाण यांचे समर्थक अभय सहस्त्रबुद्धे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांना दिले आहे. माजी आमदार सदानंद चव्हाण यांना ठेकेदार संबोधून टीका करणार्या ठेकेदार, स्वार्थी पदाधिकार्यांनी शिवसेनेची व संघटनेची वाट लावली. वरिष्ठ लोकप्रतिनिधींची हुजरेगिरी करूनच वेगवेगळ्या ठिकाणची कंत्राटे मिळवली, असा आरोप करीत सहस्त्रबुद्धे यांनी जिल्हाप्रमुख कदम यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेतला आहे. यावेळी सहस्त्रबुद्धे म्हणाले की, सामान्य जनतेला अन् शिवसैनिकांनाही खरं काय आणि खोटं काय हे माहीत आहे. त्यामुळेच असे बोलून आपली पदे राखण्याचा हा आटापिटा सुरू आहे. लोटे एम.आय.डी.सी.त भंगाराची कंत्राटे कुणाकडे? महामार्ग चौपदरीकरणातील रखडलेल्या परशुराम घाट ते सावर्डे कोंडमळा येथील कंत्राटे तसेच परशुराम घाटातील चुकीच्या पद्धतीने झालेले खोदकाम आणि तेथे झालेल्या दुर्घटनेत मातीच्या ढिगार्याखाली गाडले जाऊन गेलेले बळी, झालेली जीवितहानी ही कुठल्या कंत्राटदारामुळे झाली? आरजीपीएल गुहागर येथील कंत्राट कसं, कुणी मिळवली? पोफळी जलविद्युत प्रकल्पातील कंत्राटे कशी मिळाली? या सार्या गोष्टींची माहिती सर्वांनाच आहे. आम्ही जर या विषयात सखोल बोललो तर बरंच काही बाहेर येईल. त्यामुळे आपली पोपटपंची बंद करा, असा इशारा सहस्त्रबुद्धे यांनी दिला आहे.




