एसटी वाहकाला मारहाण करणार्‍या प्रवाशाला एक वर्षाचा कारावास

रत्नागिरी : एसटी बसच्या वाहकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणणार्‍याला न्यायालयाने एक वर्षाचा साधा कारावास व तीन हजार दंडाची शिक्षा ठोठावली आहे. विनय प्रशांत तांबे  (27, रा. सोल्ये, ता. लांजा) असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे.ही घटना 8 फेब्रुवारी 2020 रोजी सोल्ये ते जांभळ तिठा येथे घडली होती. राजापूर एसटी डेपोचे एसटी वाहक सुरज सुभाष ठीक हे राजापूर आगारातून एसटी ( एमएच 20 बीएल 0458) राजापूर ते जांभवली असे घेऊन जात असताना दुपारी तीनच्या सुमारास सोल्ये-जांभळतिठा येथे एसटी बस आली असता विनय तांबे यांनी वाहक ठीक यांच्याकडे नावाची चौकशी केली. त्यांनी प्रवासी तांबे याला तुमच्या तिकिटावर माझे नाव व बॅच नंबर आहे, असे सांगितले. याचा राग मनात धरून तांबे याने ठिक यांना शिविगाळ करुन शर्ट पकडून चेहर्‍यावर मारहाण केली व सिटवर ढकलून दिले. या प्रकरणी सुरज ठीक यांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी तपास पोलिस उपनिरीक्षक एम. एम. वालावलकर करत होते. या खटल्याचा निकाल जिल्हा सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button