सागरी सीमा मंच आयोजित स्वच्छ सागर तट अभियानाला,उत्स्फूर्त प्रतिसाद
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सागरी सीमा मंच, जिल्हा प्रशासनातर्फे रत्नागिरी जिल्ह्यात स्वच्छ सागर तट अभियानाचा मुख्य कार्यक्रम मांडवी समुद्रकिनारी संपन्न झाला. सकाळी तीन तास चाललेल्या या कार्यक्रमात कचरा संकलनासाठी तब्बल ४ हजार ६०० विद्यार्थी, नागरीक, संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये ३३ शिक्षणसंस्था, २३ सामाजिक संस्था, ५ उत्सव मंडळे, ३५ धार्मिक संस्था, १० गाव भागांचा समावेश होता. न भुतो न भविष्यती असा हा कार्यक्रम झाला. आजपासून सागर किनारे स्वच्छता ही एक चळवळच होणार आहे. या वेळी सर्व उपस्थितांनी स्वच्छ किनारे ठेवण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमात व्यासपीठावर या वेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, ठाण्याचे आमदार संजय केळकर अल्ट्राटेक कंपनीचे युनिट हेड डी. एस. चंद्रशेखर, भारतीय तटरक्षक दलाचे कमांडिंग ऑफिसर शत्रूजीत सिंग, पर्यावरण संरक्षण गतीविधी कोकण प्रांतसंयोजक उदय कुलकर्णी, मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दक्षिण रत्नागिरी कार्यवाह डॉ. सप्रे, पर्यटन सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर आदी उपस्थित होते. मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर यांनी सर्वांना किनारपट्टी स्वच्छता दिनाची शपथ दिली. त्यानंतर प्रत्यक्ष स्वच्छता करण्यात आली. राष्ट्रगीताने सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश आयरे यांनी केले.
या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील म्हणाले की, ३६ वर्षांत सागरी तट स्वच्छता अभियानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. जलचक्र पाहिले तर जैविक सृष्टी ७० टक्के पाण्यात आले. उत्पादक अशी इकोसिस्टीम आहे. कार्बन वायू घेण्याचे काम ही करते. वातावरण बदलाचा आपण आज अनुभव घेतोय. घराच्या बाहेरील घर स्वच्छ ठेवले नाही तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला सहन करावे लागणार आहेत. परंतु मानवनिर्मित कचऱ्यामुळे सूक्ष्मापासून महाकाय जीवांना त्रास सहन करावा लागतोय. सागर परिसंस्थेत आपण प्रदूषण करत आहोत. प्लास्टिकचा भस्मासुराचा अंत केला पाहिजे. प्लास्टिकचे विघटन होत नाही. त्यामुळे त्यातील सूक्ष्म घटक आपल्याला घातक आहेत. विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा वापर कमी करेन असा संकल्प आजपासून करावा. प्लास्टिक विकत घेणार नाही, ब्रश वापरतो तो चार महिन्यांनी टाकतो. त्यातून कचरा वाढत जातोय. रासायनिक खते शेतातून नदी, समुद्रात पोहोचते. जगा आणि जगू द्या या तत्त्वाने वागावे लागेल. प्लास्टिकचा कमीत कमी वापर करून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा संकल्प स्वतःपासून करा.
कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी सांगितले की, हे अभियान म्हणजे चळवळ, मोठ्या संख्येने लोकसहभाग घेतला आहे. स्वच्छतेची चळवळ लोकसहभागातूनच यशस्वी होणार आहे. आपला परिसर आणि किनाऱ्यावर अभियान करायचे आहे. आजचा दिवस साजरा करतोच आहोत, पुढच्या काळातही मी माझे घर, परिसर व शहर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करीन. एक दिवस नाही तर दररोज हा संस्कार माझ्या अंगी बाणवेन असा संकल्प करूया.
या वेळी शत्रूजीत सिंग यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकामध्ये सागरी सीमा मंच प्रांत संयोजक संतोष पावरी यांनी सांगितले की, सागरी किनारपट्टीवर सागरी सीमा मंच कार्यरत आहे. सेवा संपर्क, प्रचार, युवा, जागरण, महिला सक्षमीकरण या सर्वांना स्पर्श करीत सागरपूजन, मत्स्य जयंती, आरमार विजय दिवस, पर्याणवरण संरक्षण असे अनेक कार्यक्रम देशभक्ती जागृत करण्याचे काम मंच करत आहे. आजचे स्वच्छता अभियान केवळ एकच दिवसापुरते नाही तर आपल्या दैनंदिन वापरात प्लास्टिक – पॉलिथिन कसे वापरावे, त्याचा पुनर्वापर कसा होईल, याची दक्षता आपण घेतली पाहिजे. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आपण थांबविला पाहिजे. हीच काळाची गरज आहे, हे आपण ओळखावे व त्वरित जागे व्हावे.
कार्यक्रमात सुरुवातीला सकाळी ढोलवादनाने स्वागत करण्यात आले. मांडवी जेट्टीवर व्यासपीठ उभारले होते तर किनाऱ्यावर विद्यार्थी, नागरिक उभे होते. रा. भा. शिर्के प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी गीत सादर केले. आंतरराष्ट्रीय सागरी स्वच्छता दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडण्यात आले. तसेच सर्व मान्यवरांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला
दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यक्रम जयगड ते जैतापूर (माडबन) पर्यंत झाला. यामध्ये नांदीवडे, मालगुंड, गणपतीपुळे, आरे, काळबादेवी, मिर्या, पांढरा समुद्र, मांडवी, भाट्ये, कसोप कुर्ली, वायंगणी, रनपार बीच, गणेशगुळे, पूर्णगड, गावखडी, वेत्ये, आंबोळगड, जैतापूर, साखरी नाट्ये येथे स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात वेसवी, बाणकोट, उंबरशेत, उटंबर, आडे, लखडतर हर्णे-पाज, लाडघर, लखडतर वाडी, बुरोंडी, दाभोळ, तरीबंदर, वेलदुर, असगोली, पालशेत, बुधल, बोर्या, कोंडकारूळ, वेळणेश्वर, साखरी आगर, हेदवतड, काताळे नवानगर कुडली.आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले
www.konkantoday.com