
रत्नागिरी जिल्ह्यातील 47 सागरी, खाडी किनार्यांवर आज स्वच्छता मोहीम
रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिनानिमित्त शनिवारी 17 रोजी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी व राजापूर तालुक्यातील एकूण 47 ठिकाणचे सागरी किनारे व खाडी किनारे स्वच्छ केले जाणार आहेत. जिल्हा परिषदेतर्फे ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. प्लास्टिक, पॉलिथिन कचरामुक्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी केले आहे.
प्लास्टिक वापर नियंत्रण व व्यवस्थापन यावर परिणामकारक कृती कार्यक्रम आयोजनाच्या दृष्टीने सागर किनारी व खाडी किनारी स्वच्छता मोहीम उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. सागरी किनारी व खाडी किनार्यांमध्ये मंडणगडातील वेसवी, बाणकोट, दापोलीतील उंबरशेत, उटंबर, आडे, लखडतर (पंचनदी), लखडतरवाडी, हर्णे-पाज, लाडघर, दाभोळ, बुरोंडी, तरीबंदर (आंजर्ले). गुहागरातील वेळणेश्वर, पालशेत, वेलदूर, असगोली, बुदल, बोर्या, कोंडकारूळ, साखरीआगर, हेदवतड, काताळे, नवानगर, कुडली. रत्नागिरीतील मांडवी, भाट्ये, काळबादेवी, आरे, गणपतीपुळे, मालगुंड, नांदिवडे, मिर्या पांढरा समुद्र, कसोप, कुर्ली, वायंगणी, रनपार, गणेशगुळे, पूर्णगड, गावखडी, जयगड, कासारवेली, पावस. राजापुरातील आंबोळगड, वेत्ये, कशेळी, साखरीनाटे या ठिकाणी सागरी किनायावर स्वच्छता श्रमदान अभियान राबविणेच्या सूचना तहसीलदार, गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी संयुक्तरित्या पालन करून सागरी किनारा स्वच्छता मोहीम यशस्वी करणार आहेत.
सागरी किनारा स्वच्छता मोहिमेसाठी तालुक्यातील नागरिक शासकीय अधिकारी व कर्मचारी, नेहरु युवा केंद्र, महाविद्यालयीन विद्यार्थी, विश्वास सामाजिक संघटना, उद्योजक, शैक्षणिक संस्था, पोलिस दल, बचतगट, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांचा सहभाग असणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाकडून श्रमदान अभियानासाठी बचत गटांना सूचना देण्यात आल्या आहेत.
माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक/ प्राथमिक) यांनी शाळांना सूचना दिल्या आहे. स्वच्छता मोहिमेसाठी अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका उपस्थित राहणार आहेत. या दिवशी राष्ट्रीय शपथ घेऊन सागरी किनारा स्वच्छता मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.