चिपळुणातील गोवळकोट, पेठमाप, उक्ताड, मुरादपूर, बाजारपेठ भागाला अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा
चिपळूण : उपनगरातील गोवळकोट, पेठमाप, उक्ताड, मुरादपूर, गोवळकोट रोड, बाजारपेठ या भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने सततच्या पाणी समस्येमुळे गेल्या दोन महिन्यांपासून येथील नागरिक हैराण झाले आहेत. हा प्रश्न येत्या सात दिवसांत न सोडविल्यास आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला
आहे. मागील दोन महिन्यापासून गोवळकोट येथील जॅकवेलमधून अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे शहरवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यंदा आतापर्यंत मुबलक पाऊस झाल्याने नदीला पाणी भरपूर आहे. पण पाण्याला अडथळा निर्माण झाल्याने नदीपात्राचे दुसर्या तिरावरून वाहणारे पाणी जॅकवेलपर्यंत पोहोचत नाही. जॅकवेलच्या अवतीभोवतीच्या परिसरात वाळू मिश्रीत खडीचे ढिगारे तयार झाल्याने पाण्याला अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे पाणीपुरवठ्यात नेहमीच व्यत्यय येत आहे. ही बाब नगर परिषदेला माहिती असूनही त्यावर उपाययोजना केली जात
नाही. त्यामुळे नागरिकांना अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. याचा गांभीर्याने विचार करून सात दिवसांत तातडीने उपयायोजना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.