स्वप्नाली सावंतच्या हत्या प्रकरणात वापरलेली कार, दुचाकी पोलिसांकडून जप्त; बंगलाही केला सील
रत्नागिरी : पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत यांची हत्या करून जाळलेल्या मृतदेहाचे अवशेष गायब करण्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी, व्हेन्यु कार पोलिसांनी जप्त केली आहे. ज्या घरात स्वप्नाली सावंत यांची हत्या करण्यात आली तो बंगला पोलिसांनी सील केला आहे. त्या परिसरात जाण्याला सर्वांना बंदी घालण्यात आली आहे. दि. 1 सप्टेंबर रोजी दुपारी स्वप्नाली सावंत यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर हत्याकांडातील प्रमुख आरोपी पती सुकांत सावंत हा स्वप्नाली सावंत यांचे लोकेशन लांजा येथे असल्याचे भासविण्यासाठी आपल्या व्हेन्यु कारमधून लांजा येथे गेला होता. तेथे जाऊन काही काळ थांबल्यानंतर मोबाईल बंद करून तो परत मिर्या येथील आपल्या मूळ घरी आला होता. त्यावेळी वापरण्यात आलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे. त्याच दिवशी रात्री स्वप्नाली सावंत यांचा मृतदेह घराशेजारीच जाळून राख, हाडे पोत्यात भरून दुचाकीवरून समुद्रात नेऊन टाकली. यासाठी वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.