रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका 20 रोजी धडकणार जिल्हा परिषदेवर
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेवर 20 सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. याचे नियोजन बुधवार दि. 14 रोजी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या सहामाही सभेत करण्यात आले. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभा झाली. अंगणवाडी सेविका व कर्मचारी यांना येणार्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी दर सहा महिन्यांनी सभा होते. या सभेला 250 महिला उपस्थित होत्या. संघटनेच्या गुहागर शाखेच्या अध्यक्ष सारिका हळदणकर यांनी सांगितले की, गेले दीड वर्ष आम्ही पोषण ट्रॅकर अॅप मराठीत द्या, मानधन वाढवा, उत्तम दर्जाचे मोबाईल द्या आदी मागण्यांसाठी संघर्ष करीत आहोत. या मागण्यांसाठी मोबाईल जमा करून ऑफलाईन काम करण्याचे आंदोलनही केले होते. मात्र अजूनपर्यंत या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यातच सेवानिवृत्त झालेल्या सेविकांना अद्यापही सेवासमाप्तीनंतर मिळणारे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे आवाज उठविण्यात येणार आहे.