
पन्नास खोक्यांसाठी शिवसेनेशी गद्दारी करणार्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवावी : रत्नागिरीतील शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरे यांची टीका
रत्नागिरी : शिवसेनेतून गेलेल्या चाळीस गद्दारांनी आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणूक लढवावी, असे खुले आव्हान मी देतो. सुरुवातीला यांना आघाडी नको होती म्हणून गद्दारी केली सांगत होते. नंतर म्हणतात आम्ही हिंदुत्वासाठी शिंदे गटातून भाजपला साथ दिली. आता सांगतात भगव्या झेंड्यासाठी आम्ही बाहेर पडलो. याचे बाहेर पडण्याचे खरे कारण वेगळेच होते. पन्नास खोक्यांसाठी यांनी गद्दारी केली. स्वत: पन्नास खोके घेतल्याचे मान्य करणारे गद्दार पुन्हा खोके हवेत का? असे विचारतात, यांना लाज वाटत नसल्याची टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रत्नागिरी येथे शिवसंवाद यात्रेत केली. साळवी स्टॉप येथे हा कार्यक्रम झाला.
यावेळी व्यासापीठावर खासदार विनायक राऊत, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, आमदार तथा शिवसेना नेते भास्कर जाधव, आ. राजन साळवी, संपर्क प्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव, उदय बने, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आ. आदित्य ठाकरे म्हणाले, सत्तेवर आल्यानंतर खोके सरकारने केलेले एक काम दाखवा. उलट त्यांनी येऊ घातलेले प्रकल्प गुजरातला पाठविले आणि खापर आमच्या सरकारवर फोडत आहेत. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवण्यात आला. रायगडचा प्रकल्प पण गेला. मात्र, या राज्याच्या उद्योगमंत्र्यांना हा प्रकल्प काय होता, हेच माहिती नाही, हे दुर्दैव आहे. उद्योगमंत्र्यांनी केवळ शिवसेनेची नाही तर महाराष्ट्राशी गद्दारी केली आहे. तुमचे प्रेम असेच शिवसेनेवर, माझ्यावर, उद्धव ठाकरे यांच्यावर असू दे. येणार्या निवडणुकीत गद्दारांना धडा शिकविल्याशिवाय मी शांत बसणार नसल्याचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले.