निष्ठावंत शिवसैनिकांना उभारी देण्यासाठी युवा नेते आदित्य ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आज शुक्रवारी संवादनिष्ठा यात्रेनिमित्त रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ते येत असल्याने शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे.सकाळी साडेअकरा वाजता साळवी स्टॉप येथील जलतरण तलावाजवळ ही सभा होणार आहे. सभेत आदित्य ठाकरे शिंदे गटावर काय टीका करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. ठाकरेंच्या दौऱ्यात सेना काय साध्य करणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर निष्ठावंत शिवसैनिकांना उभारी देण्याच्या दृष्टीने आदित्य ठाकरे यांनी दौरे सुरू केले आहेत. ज्या ठिकाणी आमदार फुटले आहेत, तेथे ही संवादनिष्ठा यात्रा होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, दापोलीचे आमदार योगेश कदम आणि चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण शिंदे गटात सामील झाले आहेत. शिवसेनेला हा मोठा धक्का असून त्यातून सावरण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. अशा अडचणीच्याप्रसंगी निष्ठावंत शिवसैनिक पक्षाच्या मागे ठाम उभा आहे. अनेक जुने-जाणते आता पुन्हा सक्रिय होत आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देण्यासाठी ठाकरे दौऱ्यावर येत आहेत. शहरातील साळवी स्टॉप येथील जलतरण तलावजवळ ही जाहीर सभा होणार आहे. त्यासाठी भव्य स्टेज बांधले असून, १५ हजार लोक येण्याच्या दृष्टीने संपूर्ण तयारी केली आहे. शहरात ठाकरेंच्या स्वागतासाठी मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत.
www.konkantoday.com