चिपळुणात डेंग्यू, मलेरियाची साथ
चिपळूण : चिपळूण शहरामध्ये गतवर्षीप्रमाणेच पुन्हा एकदा डेंग्यूसदृश आजाराने डोके वर काढले आहे. डेंग्यूसदृश आजारासह मलेरिया आजाराच्या रुग्णांत वाढ होऊ लागली आहे. शहरातील खेंड परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. शहरातील काही नागरी वस्तीत मलेरिया आजाराने त्रस्त झालेल्या रुग्णांची उपचारासाठी खासगी उपचार केंद्रात धावपळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे. डासांपासून निर्माण होणार्या या आजारामुळे शहरातील अनेक नागरिक त्रस्त झाले आहेत. रक्त तपासणार्या खासगी प्रयोगशाळेतून आजारी रुग्ण मोठ्या प्रमाणात रक्त तपासणी करून घेत आहेत. त्यामध्ये मलेरिया, डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे असल्याचे संबंधितांना निदर्शनास आणून दिले जात आहे. डेंग्यू हा एका विशिष्ट डासापासून होणारा आजार असून, तो घरातील अथवा परिसरातील स्वच्छ पाण्यातच आपल्या पिढीची उत्पत्ती करीत असतो. त्यातूनच हा आजार पसरवित असल्याची प्राथमिक माहिती उपचार करणार्या संबंधितांकडून रुग्णांना दिली जात आहे. त्यातूनच घर परिसरातील पाणवठ्याची योग्य काळजी व निचरा घेण्याबाबत सल्ला दिला जात
आहे.