
खेडमध्ये दुचाकी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या
खेड : तालुक्यात दुचाकी चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. वेरळ निवासी संकुलातून दि. 11 रोजी चोरीला गेलेली दुचाकी आवाशी गावाजवळ दि. 13 रोजी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चोरट्यासह ताब्यात घेतली आहे. खेड रेल्वे स्टेशनसमोरील समर्थ कृपा विश्वस्नेहा अपार्टमेंटजवळ लावलेली दुचाकी (एम.एच.08/ एन/ 2734) ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याबाबत विठोबा विष्णू घाणेकर (वय 57 वर्षे, रा. वेरळ, ) यांनी दि 13 रोजी तक्रार खेड पोलीस ठाणे येथे दिली होती. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला होता. दि. 13 रोजी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे कर्मचारी प्रशांत बोरकर, संजय कांबळे, अरुण चाळके , बाळू पालकर, सागर साळवी , योगेश नार्वेकर , सत्यजित दरेकर , दत्तात्रय कांबळे हे खेड उपविभागात आले होते. दि.13 रोजी सायंकाळी सुमारे 5.00 वा. आवाशी गावाजवळ एक मोटार सायकलस्वार संशयितरित्या दिसून आला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याचे नाव जय उर्फ सोन्या शिवाजी चव्हाण (वय 25 वर्षे, रा. चोचींचे स्टॉप जवळ, ता . महाड , जि . रायगड) असे त्याने सांगितले. त्या इसमाकडे केलेल्या चौकशीत त्याच्याजवळ असलेली दुचाकी (एम. एच.08 / एन / 2734) ही त्याने चोरली असल्याची कबुली दिली. त्याला ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या पथकाने खेड पोलिस ठाणे येथे चौकशी केली. त्याला अटक करून पुढील तपासासाठी खेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दि.14 रोजी येथील न्यायालयात त्याला हजर केले असता त्याची जामिनावर मुक्तता झाली आहे.