
चोरांची हिम्मत वाढली अत्यंत सुरक्षित पोलीस वसाहतीतच चोरी, पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची घरे फोडली!
बुलढाणा जिल्हा मुख्यालय तथा पोलीस दलाचे देखील मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात अज्ञात चोरांच्या टोळीने पोलिसांच्या घरांना लक्ष्य बनवून पोलिसांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. या टोळीने चक्क अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या पोलीस वसाहतीत मोठा डल्ला मारला. पोलीस कर्मचाऱ्याच्या सरकारी घरात त्यांनी अत्यंत शांत चित्ताने आणि सुनियोजितपणे हात साफ करीत चार ते पाच कनिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याच्या घरातील रोख रक्कम, किंमती वस्तू आणि सोन्या चांदीचे दागिने बेमालूम रित्या लंपास केले.
प्राथमिक माहितीनुसार किमान पाच पोलिसांच्या घरात घुसून चोरांनी कमी अधिक २० लाखांचा मुद्देमाल लांबवला. बुलढाणा पोलीस वसाहती मध्ये पाच ठिकाणी चोरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आज शनिवारी, ६ डिसेंबर रोजी ही बाब उघडकीस आल्यावर पोलीस लाईनमध्ये खळबळ उडाली. वसाहतीत राहणारे पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या परिवारात चोरीची चर्चा होती.
ही बातमी शहरात वाऱ्याच्या वेगाने पसरली. यामुळे अज्ञात चोरांच्या सुसज्ज टोळीने थेट पोलीस दलाला आव्हान दिल्याचे चित्र आहे. चोरीची घटना समोर आली आहे.




