रिफायनरी प्रकल्प राजापुरातच होणार! : उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई : राजापूर तालुक्यात होणार्‍या रिफायनरी प्रकल्पाला जनसामान्यांतून पाठिंबा मिळत असल्याने आता त्याबाबत गैरसमज पसरवले जात आहे. मात्र, रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत राज्याबाहेर जाणार नसून तो राजापुरात होण्यासाठीच प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मुंबईत बोलताना  दिली.  
ना . सामंत म्हणाले, रिफायनरी प्रकल्पामुळे मोठी रोजगार निर्मिती होणार आहे.  राज्यात मोठे प्रकल्प आणायचे असल्यास राजकारण बाजूला ठेवणे गरजेचे आहे. राजापूरचे स्थानिक आमदारही रिफायनरी प्रकल्पासाठी आग्रही आहेत. राजकारण करण्यापेक्षा सर्वच पक्षांनी राज्यात येणार्‍या प्रकल्पांबाबत अभ्यास करावा. राजापूर तालुक्यात गेल्या काही महिन्यात प्रकल्पाच्या बाजूने बहुसंख्य जनतेतून पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे काही एनजीओ स्थानिकांना भडकवून विरोधी वातावरण तयार करण्याचे काम करीत आहेत. येथील तरूण आता या गैरसमजांना बळी पडणार नाही, असेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले.
बल्क ड्रग्ज पार्कचा प्रकल्प महाराष्ट्रात होणार आहे. तसेच नागपूरमध्ये टाटा एअरबसचा प्रकल्प होणार असल्याची माहिती देखील ना. सामंत यांनी यावेळी दिली. वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. यावरून राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राजकीय दबावापोटी प्रकल्प गुजरातला गेला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. यासंदर्भात ना. सामंत यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पातून जेवढ्या नोकर्‍या मिळणार होत्या, त्याच्या दुप्पट नोकर्‍या पुढच्या काळात महाराष्ट्रात आणण्याची जबाबदारी मी घेतो, असे आश्वासन देखील यावेळी ना. सामंत यांनी दिले.  उच्च तंत्र शिक्षण विभाग आणि उद्योग विभाग एकमेकांशी संलग्न असणे गरजेचे आहे. यासंबंधी आम्ही धोरण तयार करत असल्याचे सामंत म्हणाले. येत्या काही दिवसात चांगला प्रकल्प महाराष्ट्राला मिळेल, असेही ना.  सामंत यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button