फळमाशीचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शिळ येथील शेतकर्याने केला देशी जुगाड
सध्या काकडी, पडवळ, दोडकी अशा फळपिकांवर मोठया प्रमाणात फळमाशीचा प्रार्दुभाव झाला आहे. त्यामुळे ही फळे सडून शेतकर्याचे मोठे नुकसान होत आहे. यावर शिळ येथील तरूण शेतकरी सुनिल गोंडाळ यांनी निरीक्षणाअंती यु टयुबच्या आधारे प्रभारी उपाय शोधून काढत यशस्वी उपाययोजना केली आहे. सुनिल गोंडाळ यांचा हा उपाय शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार असून याचा फायदा आंबा पिकालाही होणार आहे.
फळांवर पडणारी ही फळमाशी तयार झालेल्या फळांवर मोठया प्रमाणात अॅटक करते. यावेळी ही फळमाशी या फळातील रस शोषून घेऊन त्यात ती अळी घालते. त्यामुळे या फळांना कीड सदृश्य लागण होऊन तयार फळे पुर्णत: बाधीत होत आहेत. त्यावर गोंडाळ यांनी लूर गोळीचा वापर करत प्लास्टीक बाटल्यांच्या आधारे सापळा बनवत यावर प्रभावी उपाय शोधला आहे.
गोंडाळ हे छोटया प्रमाणात आंबा व्यवसाय करतात. मागील हंगामात त्यांनी पाठविलेल्या आंबा पेटयात बहुतांशी आंबे खराब निघाल्याने त्यावर विचार करत त्यानी फळमाशीच्या प्रार्दुभावामुळे आंबा फळ खराब होत असल्याचा निष्कर्ष काढला. मात्र यावर काय उपाय योजना करावी याबाबत त्यानी यु टयुबच्या आधारे काही माहिती मिळविली आणि कृषी पदवीका मिळविलेल्या गावातील तरूण नामदेव गोंडाळ यांच्या मदतीने लूर नामक गोळीचा वापर करत सापळा बनविला.
सध्या शेतकऱ्यांना पावसाळी काकडी, पडवळ, दोडकी यांची लागवड केली आहे. मात्र त्यावरही मोठया प्रमाणात या फळमाशांनी अॅटॅक केल्याचे निदर्शनास आल्यावर गोंडाळ यांनी हा उपाय करून पाहीला. त्यात त्यांना यश आले आहे. यासाठी प्लास्टीकच्या बाटलीत छोटे छोटे होल मारून अर्ध्यावर रंगीत पाणीभरले त्यावर लूरची गोळी टांगली. लूरच्या वासाने आणि रंगीत पाण्याकडे माशा आकर्षित होतात आणि बाटलीत शिरतात. बाटलीमध्ये असलेल्या लूर गोळीच्या वासाने त्यांना गुंगी येते आणि आपसूक त्या खालच्या पाण्यात पडतात.
अशा प्रकारे त्यांनी सापळे बनवून फळमाशीचा प्रार्दुभाव रोखला आहे
www.konkantoday.com