‘किसान सन्मान’चा लाभ घेणाऱ्या 50 हजार लाभार्थ्यांची नावे रद्द; जिल्ह्यात ई- केवायसीचे 69 टक्के काम पूर्ण
रत्नागिरी : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थीचे ई- केवायसीचे अर्थात आधारकार्ड लिंक करण्याची मोहीम रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असून 69 टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामगिरीमध्ये रत्नागिरी तालुका अव्वल ठरला असून दापोली तालुका पिछाडीवर आहे. ई केवायसीमध्ये तब्बल 50 हजार 55 लाभार्थींची ओळख पटलेली नसल्याने ही नावे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रत्नागिरी तालुक्याने 29 हजार 641 लाभार्थीपैकी 23 हजार 725 लाभार्थीचे इ केवायसी करून 80 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्याखालोखाल गुहागर 16 हजार 336 आणि मंडणगडने 4 हजार 759 लाभार्थीचे आधार लिंक करत 76 टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे. चिपळूण 74 टक्के तर राजापूर 71 टक्क्यांपर्यंत पोहोचला असून त्यांनी अनुक्रमे 21 हजार 4 आणि 14 हजार 226 लाभार्थीपर्यंत पोचण्यात यश मिळवले आहे. संगमेश्वर, लांजा आणि खेडने साठ टक्क्यांवर कामगिरी केली आहे. यामध्ये संगमेश्वर 67 टक्क्यांसह 22 हजार 929, लांजा 63 टक्क्यांसह 10 हजार 556, तर खेड तालुका 60 टक्क्यांसह 11 हजार 813 लोकांपर्यंत पोहोचला आहे. सर्वात शेवटी असलेल्या दापोली तालुक्याने 57 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असून येथील 16 हजार 393 लाभार्थीचे ईकेवायसी पूर्ण झाले.
संपूर्ण जिल्ह्यातील दोन लाख चार हजार 741 लाभार्थीपैकी 69 टक्के आधार जोडणीचे काम पूर्ण झाले असून 62 हजार 713 जोडणी अजून शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या मोहीमेतून अनोळखी लाभार्थीची नावे शोधून ती रद्द करण्याचा उद्देशही मोहिमेतून साधला जाणार आहे. त्यात जिल्ह्यातील एकूण 50 हजार 555 नावे अपात्र असल्याचे उघड झाले आहे. तसेच मृत स्थानिक लाभार्थीची नावेही शोधण्यात येत
आहे. अनोळखी लाभार्थी नोंदीवरून रत्नागिरी आणि संगमेश्वरनंतर दापोली तालुक्यात दोन हजार 689 नावं अपात्र ठरणार आहेत. इतर सर्व तालुक्यांत अशा लाभार्थीची नोंद एक हजारांपेक्षा कमी आहे, असे एका अधिकृत आकडेवारीवरून स्प्ष्ट झाले
आहे. ही ई-केवायसी झाल्यानंतर लाभार्थीच्या खात्यावर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता जमा केला जाणार आहे.