
स्वप्नाली सावंतच्या मोबाईलमध्ये दडलंय तरी काय? पोलिसांनी मोबाईलसाठी विहीरच उपसायला केली सुरूवात
रत्नागिरी : तालुक्याला हादरवून टाकणार्या माजी पं. स. सभापती स्वप्नाली सावंत यांच्या खून प्रकरणात दररोज नवनवीन उलगडे होत आहेत. स्वप्नालीला तिच्या पतीने का जाळले? या कारणाचा शोध पोलिसांकडून घेतला जात असून आता स्वप्नालीचा मोबाईलचा कोठे आहे? याचा शोध पोलिस घेत आहेत. स्वप्नालीच्या मोबाईलचा थांगपत्ता लागत नसल्याने हा मोबाईल नेमका गेला तरी कोठे? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. घराशेजारी असलेल्या विहिरीत मोबाईल टाकण्यात आल्याच्या अंदाजाने पोलिसांनी आता घराजवळील विहीर उपसण्याचे काम मंगळवारी हाती घेतले आहे. हत्येचा पुरावा शोधून काढण्यासाठी पोलिसांनी या तपासाची चक्रे फिरवली आहेत. गेल्या काही दिवसांपासून संशयित आरोपी पती सुकांत सावंतच्या घराजवळील परिसर पोलिस पिंजून काढत आहेत.
संशयित आरोपी पती सुकांत सावंत, रुपेश सावंत आणि प्रमोद गावणंग यांनी स्वप्नालीचा खून केल्यानंतर मोबाईलमधील सिम काढून घेतले. त्यानंतर तिघेही चांदेराई मार्गे लांजा येथे गेले आणि त्याठिकाणी ते सीम दुसर्या मोबाईलमध्ये टाकून स्वप्नालीचे लोकेशन लांजा येथील दाखवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.परंतु हे तिघेही कारने लांजा येथे जात असताना चांदेराई येथे सिसिटीव्हीत कैद झाले आहेत. पोलिस तपासात स्वप्नालीचा पती सुकांत सावंत हा पोलिसांची सातत्याने दिशाभूल करत आहे. पोलिसी खाक्या दाखवूनही तिघेही संशयित समाधानकारक उत्तरे देत नसल्याने तपासात अडचणी येत आहेत. मात्र सीसीटीव्ही फुटेजमुळे आता स्वप्नालीच्या मूळ मोबाईलचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. त्यादृष्टीने मंगळवारी पोलिसांनी विहीर उपसण्याचा निर्णय घेतला.
स्वप्नालीला घराच्या आवारात जाळल्यानंतर परिसरातील झाडेही होरपळलेली होती. या होरपळलेल्या झाडांच्या फांद्या तोडून तोही पुरावा नष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणात केवळ 3 नव्हे तर आणखी काही संशयितांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. 30 ऑगस्टपासून 5 सप्टेंबरपर्यंत स्वप्नालीच्या मोबाईलची हिस्टरी पोलिस तपासून पाहणार आहेत. स्वप्नालीच्या खूनानंतर कोणतेही पुरावे मागे राहू नयेत, याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे. मात्र तपासात पोलिसांच्या हाती काय लागणार? याकडे लक्ष लागले आहे.