
मोदींना शपथ घेऊ द्या मग खेळ सुरु होईल, हे सरकार चालणार नाही- संजय राऊत
लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले असून ते तिसऱ्यांदा सत्तेवर येणार आहेत. नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळही निश्चित करण्यात आली आहे. ८ जून रोजी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे.नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी समर्थनाचे पत्र दिल्यानंतर मोदी आता राष्ट्रपतींकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींना शपथ घेऊ द्या मग खेळ सुरु होईल, असे सूचक विधान केलं आहे.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीएकडून सत्तास्थापनेचा दावा करण्याची तयारी सुरु झाली आहे. भाजपने मित्रपक्षांसोबत बैठक घेऊन सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा सुरु केली आहे. एनडीएची बैठक संपली असून ते सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे.आम्ही सत्तेचे भुकेले नाहीत. भाजप मोठा पक्ष आहे. त्यांचा सत्ता स्थापन करण्याचा पहिला अधिकार आहे. राष्ट्रपती, बहुमत घरचे आहे. आता राष्ट्रपती भवनात जातील आणि दावा करतील. मोदींना शपथ घेऊ द्या मग खेळ सुरु होईल. हे सरकार चालणार नाही. आम्हाला तर मोदींनी लवकरात लवकर शपथ घ्यावी असे वाटते. त्यांच्यातर्फे आम्ही मिठाई वाटू. नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांनी त्यांच्यासोबत निवडणुका लढल्याने त्यांना समर्थन पत्र द्यावं लागेल. चंद्राबाबू आणि नितीश बाबू यांना देश ओळखतो. ते काय फक्त भाजपचे नाहीत, सगळ्या पक्षाचे आहेत. पण मोदींनी युती सरकार चालवण्याचा किती अनुभव आहे. मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेण्याचा विक्रम घेऊ द्या मग पाहू,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.www.konkantoday.com