
दापोलीकर मूर्ती विसर्जनावरून आक्रमक, आंदोलनाचा इशारा
दापोलीतील नागरिक मूर्ती विसर्जनावरून आक्रमक झाले आहेत दापोली नगरपंचायतीने जर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन घाटात तसेच स्टेट बँकेसमोरील नदीत गणेश विसर्जन करू दिले नाही तर गणेशमूर्ती रस्त्यावर ठेवून आंदोलन करू असा इशारा दापोलीकरांनी दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दापोली नगरपंचायत प्रशासनाने दि. २३ रोजी दापोली शहरातील दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी दापोली शहरात तीन ठिकाणी कृत्रिम तलाव तयार केले. या तलावात तीनवेळा मूर्ती बुडून गाडीत ठेवल्या. प्रत्यक्षात त्या दाभोळ खाडीत विसर्जित केल्याने शहरात याचे संतप्त पडसात उमटले. विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनी नगरपंचायत कार्यालयात प्रशासनाला धारेवर धरले.
या संदर्भात आपल्या तीव्र प्रतिक्रिया देताना भाजपचे शहराध्यक्ष संदीप केळकर म्हणाले की, दापोली नगरपंचायतीने गणेश विसर्जन घाटाच्या दुरूस्तीसाठी व सुशोभिकरणासाठी खर्च केलेले ८० लाख रुपये पाण्यात गेले असून या दुरूस्त केलेल्या विसर्जन घाटातील पाणी नेमके मुरते कोठे? याचा दापोलीकरांनी शोध घेणे आता गरजेचे आहे. जर नगरपंचायत प्रशासनाला दुरूस्त केलेल्या गणेश विसर्जन घाटात पाण्याची पातळी राखता येत नसेल तर नगरपंचायत प्रशासनाने आम्हाला सांगावे. या विसर्जन घाटात पाणी साठून राहिल अशी व्यवस्था आम्ही करू.
मनविसेचे जिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड म्हणाले, दापोली शहरातील पेन्शनर्स असोसिएशनच्या कार्यालयाजवळ असलेली स्वातंत्र्यसैनिक कै. बाबा फाटक उद्यान असलेल्या तलावात तसेच स्टेट बँकेसमोरील नदीतील वाहत्या पाण्यात गणेशमूर्ती विसर्जन करण्यास नगरपंचायत प्रशासनाने परवानगी द्यावी. दाभोळमध्येच जर मूर्ती विसर्जित करावयाच्या असतील तर त्या नगरपंचायतीने कशाला विसर्जित करायला हव्यात? दापोलीकर स्वतः दाभोळला आपल्या गणेशमूर्ती घेऊन विसर्जनाला जातील असे म्हटले आहे
www.konkantoday.com