
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे वेध लागले
आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरीही जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे वेध लागलेले आहेत. ऑनलाईन पोर्टलवर जिल्ह्यातील पावणेसहा हजार शिक्षकांनी भरलेली माहिती तपासण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर रिक्त जागांची माहिती आणि शिक्षकांकडून बदलीबाबत जागांची माहिती भरून घेतली जाणार आहे ही प्रक्रिया दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत.
२०१९ साली प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यामध्ये ९२ टक्के शिक्षकांना दिलासा मिळाला तर तालुक्यातील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना अन्य तालुक्यात जावे लागले. ऑनलाईन यादी प्रसिद्ध झाल्यानंतर काही शिक्षकांनी याविरोधात आवाज उठवला होता. परंतु प्रशासनाकडून तांत्रिक चुकांची दुरूस्ती करूनच बदली प्रक्रिया राबविलेली होती. कोरोनामुळे दोन वर्षे बदल्याच झाल्या नव्हत्या. यंदाही मे महिन्यात होणार्या बदल्या पुढे ढकलण्यात आल्या. अजूनही त्याला मुहूर्त सापडलेला नाही. www.konkantoday.com