
चिपळुणातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा; शिवसेनेचे मुख्याधिकार्यांना निवेदन
चिपळूण : शहर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी शहर शिवसेनेच्यावतीने मुख्याधिकार्यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. शहरातील उपनगर परिसरात भटक्या आणि मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून प्रामुख्याने गोवळकोट रोड, पेठमाप परिसरात मोठ्या परिसरात भटकी कुत्री टोळक्याने फिरत आहेत. उपनगरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत सध्या वाढ झाली आहे. भटक्या कुत्र्यांमुळे लहान मुले, उशिराने घरी परतणारे कर्मचारी, महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. वाहनांचा पाठलाग करणे, लहान मुलांच्या अंगावर जाणे असे प्रकार घडत आहेत. नगर परिषदेने दोन वर्षांपासून दोन ते तीनवेळा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निर्बिजीकरण मोहीम सुरू केली. मात्र, त्यानंतर देखील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढल्याचे दिसून येत आहे. शहरातील उपनगर व नागरी वस्तीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मटण, मच्छी, चिकन विक्रेते यांनी रस्त्याच्या कडेनेच व्यवसाय सुरू केल्याने या परिसरात टाकाऊ पदार्थ खाण्यासाठी ही भटकी कुत्री गोळा होतात. यानंतर रात्रीच्यावेळी टोळक्याने फिरून रहिवाशांच्या अंगावर जाण्याचे प्रकार घडतात. तरी, न.प.ने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.