आडिवरेच्या तन्मय हर्डीकर यांना ‘व्याकरणरत्न’ पदवी
राजापूर : तालुक्यातील आडिवरे येथील तन्मय प्रदीप हर्डीकर यांनी ‘व्याकरणरत्न’ ही पदवी संपादन केली आहे. अतिशय कठीण समजल्या जाणार्या या परीक्षेत हर्डीकर यांनी सुयश मिळवले असून, आंध्रप्रदेशमधील काकीनाडा येथे दि. 3 सप्टेंबरला त्यांची व्याकरणशास्त्राची महापरीक्षा झाली. त्यानंतर कांची कामकोटी पीठाधीश विजयेंद्र सरस्वती स्वामी महाराज यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
या परीक्षेचे स्वरूप फार कठीण असते. संस्कृत भाषेतील विविध शास्त्रांचे पारंपरिक पद्धतीने अध्ययन प्रामुख्याने संस्कृत पाठशाळांमध्ये दिले जाते. या शिक्षणाच्या परीक्षा शृंगेरी, तेनाली इ. ठिकाणी घेतल्या जातात. या परीक्षांचे स्वरूपही वेगळे असते. श्री कांचीकामकोटी पीठातर्फे शास्त्रपोषक सभा, तेनाली (आंध्र प्रदेश) येथे शास्त्र परीक्षा आयोजित केल्या जातात. अद्वैत वेदांत, मीमांसा, व्याकरण आणि न्याय अशा 4 शास्त्रांच्या परीक्षा होतात. प्रत्येक शास्त्रांची सहा महिन्यांनी परीक्षा होते. अशा साधारण 14 ते 16 सत्र परीक्षा होतात. यामध्ये 100 गुणांची लेखी आणि 100 गुणांची तोंडी परीक्षा होते. उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही परीक्षेत प्रत्येकी 50 गुण मिळणे आवश्यक असते.
या सर्व सत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच कांची कामकोटी पीठाच्या शंकराचार्यांसमोर महापरीक्षा होते. महापरीक्षा फक्त तोंडी स्वरूपात असते. पूर्वी अभ्यास केलेल्या ग्रंथातील निवडक ग्रंथ अभ्यासक्रमात असतात. प्रत्येक ग्रंथावर एक वा दोन प्रश्न विचारले जातात. महापरीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्या त्या शास्त्रात ‘रत्न’ ही उपाधी देण्यात येते.