संपकाळात एसटीला साथ देणार्या चिपळुणातील 23 जणांना कामावरून केले कमी
चिपळूण : संपकाळात सेवा बजावलेल्या चिपळूण आगारातील 23 कंत्राटी चालकांना ऐन गणेशोत्सवात कल्पना न देताच कमी केले आहे. एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन व्हावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचार्यांनी गतवर्षी दिवाळीपासून संप पुकारला होता. हा संप मागे घ्यावा यासाठी अनेकदा प्रयत्न झाले असले तरी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने यातूनच हा संप आणखीन ताणला. यावर उपाय म्हणून एसटी महामंडळाने तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी कर्मचार्यांना सामावून घेतल्याने यातूनच ठप्प झालेल्या प्रवासी सेवा पुन्हा सुरु झाल्या होत्या. प्रत्यक्षात तीन महिन्यांच्या करारावर कंत्राटी चालकांना सामावून घेण्यात आले होते. चिपळूण आगारात 23 चालकांना कामावरून कमी केले. त्यांचे मूळ वेतनही कमी करण्यात आले. बुधवारी 23 कंत्राटी चालक आगारात एकत्र आले होते. त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला.