
रत्नागिरी-मजगाव येथे घरावर झाड पडून नुकसान
रत्नागिरी : शनिवारपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी दमदार पाउस कोसळला. चिपळूण, संगमेश्वरसह रत्नागिरी तालुक्यात मुसळधार सरी पडल्या असून उर्वरित तालुक्यात हलका पाऊस झाला. राजापूर तालुक्यातील कोदवली नदीने 5.20 इतकी इशारा पातळी ओलांडली होती. रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथे घरावर झाड पडून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरातील कुणालाही दुुखापत झाली नाही.
शनिवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथे इरफान मुकादम, फिरोज मुकादम यांच्या घरावर हापूसचे कलम कोसळले. मुकादम कुटुंबीय अर्ध्या झोपेत होते. मोठा आवाज आल्यानंतर घरातील सर्व लोक बाहेर धावले. या घटनेत भलेमोठे झाड घरावर कोसळलेले होते. सुदैवाने यामध्ये कुणालाच दुखापत झाली नाही. घटनेवेळी घरात मुकादम कुटुंबातील सहाजण होते. यामध्ये घराची एक बाजू पूर्णत: कोसळली असून एक लाखापर्यंत नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा प्रकार समजल्यानंतर मजगावचे सरपंच फय्याज मुकादम यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तातडीने वीज कर्मचार्यांना बोलावून वीज पुरवठा खंडित करण्यात आला.