शिवसेनेतील मधल्या यंत्रणेने मुख्यमंत्री ठाकरेंपर्यंत पोहोचू दिले नाही…तीन वर्षे मुख्यमंत्री सेनेचा असतानाही काडीचाही निधी मतदार संघाला मिळाला नाही…कार्यकर्त्यांसमोर कोणत्या तोंडाने जाणार…त्यामुळे आता शिंदे गटात जायचा निर्णय घेतोय : शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांचे प्रतिपादन
चिपळूण : मागच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी भरीव निधी मिळेल, संघटनेला ताकद मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु या कालावधीत संघटनेला बळ देण्याचे काम झाले नाही. शिवसेनेचे मुख्यमंत्री असतानाही तीन वर्षात मतदार संघातील कार्यकर्त्यांना काडीचाही विकासनिधी मिळाला नाही. सेनेतील मधल्या यंत्रणेने आपली अडचण केली. मुख्यमंत्र्यापर्यंत आपल्याला पोहोचू दिले नाही. परिणामी कार्यकर्त्यांचे समाधान करू शकलो नाही. आता कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे आपल्यासमोर दोन पर्याय होते. राजकारणातून विश्रांती घेणे, किंवा चांगला पर्याय शोधणे. याबाबत आपण मतदार संघातील कार्यकर्त्याशी संवाद साधला, बैठकाही घेतल्या. कार्यकर्त्यांना बळ द्यायचे असेल तर चांगले माध्यम हवे आहे. म्हणून शिंदे गटात सामिल होण्याचा निर्णय घेत आहे, असे मत चिपळूण-संगमेश्वरचे शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
चव्हाण पुढे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विस्तृत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्यावर मोठी जबाबदारी देण्याचे आश्वासन दिले आहे. आपण या मतदार संघातून जिंकण्यासाठी लढणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या काही दिवसात चिपळुणात मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत जाहीर मेळावा होईल, असेही चव्हाण म्हणाले. तीन वर्ष काहीच करता आले नाही. येणाऱ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असल्याने कोणत्या तोंडाने मतदारासमोर जायचं? हा माझ्यासह सर्वांसमोर प्रश्न होता. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. भेटीत सहकार्याची हमी दिली गेली. त्यामुळे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यानंतर शिंदे गटाच्या संघटनात्मक कार्याला प्रारंभ केला जाणार आहे. सध्या ८० टक्के कार्यकर्ते आपल्यासोबत असल्याचा दावा माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.